बाप
आई घराचं मांगल्य असते, तर बाप घराचे अस्तित्व असतो. पण घराच्या या अस्तित्वाला खरच आम्ही कधी समजून घेतले आहे का? वडिलांना महत्व असूनही त्यांच्याविषयी जास्त लिहील जात नाही. कोणताही व्याखाता आई विषयी बोलत राहतो. संत महात्म्यांनी देखील आईचेच महत्व सांगितलेले आहे. देवादिकांनी आईचेच गोडवे गायले आहेत. लेखकांनी कवींनी आईचेच तोंडभरून कौतुक केलेले आहे. चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते, पण बापाविषयी कुठेच फारस बोललं जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला, पण तोही तापट व्यक्ती. समाजात एक दोन
टक्के बाप असे असतीलही, पण चांगल्या बापाबद्दल काय?
आईकडे अश्रुंचे पात असतात, पण बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते पण सांत्वन मात्र बापालाच करावे लागते आणि रडणाऱ्या पेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडतो. कारण ज्योतीपेक्षा समईच जास्त तापते ना? पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळत राहते. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो. सर्वांसमोर आई मोकळेपणाने रडू शकते, पण रात्री उशीत तोंड खुपसून मुसमुसतो तो बाप असतो. आई रडते, वडिलांना रडता येत नाही. स्वताचा बाप मेला तरी त्याला रडता येत नाही. कारण छोट्या भावंडांना जपायचं असत. आई गेली तरीही रडता येत नाही कारण बहिणींचा आधार व्हायचं असत. पत्नी अर्ध्यावरच सोडून गेली तरी पोरींसाठी अश्रूंना आवर घालावा लागतो.
जिजाबाईनी शिवाजी घडवला अस म्हणतात, पण त्याचवेळी शहाजी राजांची ओढाताण सुद्धा ध्यानात घ्यावी. देवकीच, यशोदेच कौतुक अवश्य कराव, पण पुरातून मुलाला डोक्यावर घेवून जाणारा वासुदेव सुद्धा लक्षात ठेवावा. राम हा कौशल्येचा पुत्र जरूर असेल, पण पुत्र वियोगाने तडफडून मरण पावणारा तो पिता दशरथ होता.
वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपलांकडे बघितले कि त्यांचा त्रास समजतो, त्यांचे फाटके बनियन बघितले कि कळते कि आपल्या नशिबाची भोकं त्यांच्या बनियनला पडलीत. त्यांची दाढी वाढली कि चेहरा त्यांची काटकसर दाखवतो. मुलीला गाऊन घेतील, मुलाला जीन्स घेतील, पण स्वत मात्र जुनेच कपडे वापरतील. मुलगा सलून मध्ये जाऊन वीस-पंचवीस रुपये खर्च करील, मुलगी पार्लर मध्ये जाऊन खर्च करेल, पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणून अंघोळीच्या साबणाने दाढी करतो. अनेकदा तो नुसत्या पाण्यानेही दाढी करतो. बाप आजारी पडला तर लगेच दवाखान्यात जात नाही. तो आजाराला घाबरत नाही, पण डॉक्टर आराम करायला लावतील याची त्याला भीती वाटते. कारण पोरीच लग्न, पोराच शिक्षण अजून बाकी असत. घरात उत्पन्नाच दुसर साधन नसत, ऐपत नसते, तरीदेखील मुलाला इंगिनीअरिंग, मेडीकाल ला प्रवेश मिळवून दिला जातो. ओढाताण सहन करून मुलाला दर महिन्याला पैसे पाठवले जातात, पण सर्वच नसली तरी काही मुलं अशी असतात कि जे तारखेला पैसे मिळताच मित्रांना परमीत रूम मध्ये पार्ट्या देतात आणि ज्या बापाने पैसे दिले त्याच बापाची टिंगल करतात. एकमेकांच्या बापाच्या नावाने एकमेकांना हाका मारतात.
आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. ज्या घरात बाप आहे त्या घराकडे कोणी वेत नजरेने बघू शकत नाही, कारण घरातला कर्ता जिवंत असतो. तो जरी काहीही करीत नसला, तरीही तो त्या पदावर असतो आणि घराचं कर्म बघत असतो. कोणाच मुलगा होण टाळता येत नाही, पण बाप होणं टाळता येतं, पण बाप कधीच होण्याच टळत नाही. आईच्या असण्याचा अथवा नसण्याचा बापामुळे अर्थ असतो.
कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते, कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतुक करते. पण गुपचूप जाऊन पेढ्यांचा पुडा आणणारा बाप कोणाच्याच लक्षात राहत नाही. पहिल्या बाळणतनीच खूप कौतुक होत, पण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे वावरणाऱ्या त्या बाळाच्या बापाची कोणीही दाखल घेत नाही.
चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर “आई गं !” हा शब्द बाहेर पडतो, पण रस्ता पार करताना ट्रक जवळ येऊन ब्रेक लावतो तेव्हा “बाप रे !” हा शब्दच बाहेर पडतो. छोट्या संकटांसाठी आई चालते पण मोठमोठी वादळे पेलताना बापच आठवतो.
कोणत्याही मंगल प्रसंगी घरातील सर्वजण जातात, मयताच्या प्रसंगी बापालाच जावे लागते. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नसतो. गरीब लेकीच्या घरी थोडा वेळ का होईना जात असतो. तरुण मुलगा उशिरा घरी येतो, तेव्हा बापच जागा असतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबापुढे लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप घरच्यांसाठी व्यथा दडपणारा बाप खरंच किती ग्रेट असतो नाही?
वडिलांचं महत्व कोणाला कळत? लहानपणीच वडील गेल्यावर अनेक जबाबदाऱ्या खूप लवकर पेलाव्या लागतात त्यांना एकेक वस्तूसाठी तरसाव लागतं. वडिलांना खऱ्या अर्थाने समजावून घेते ती त्या घरातली मुलगी. सासरी असणाऱ्या अथवा घरापासून दूर असणाऱ्या मुलीला बापाशी फोनवर बोलताना बापाचा बदललेला आवाज लगेच कळतो. ती अनेक प्रश्न विचारते. कोणतीही मुलगी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून बाप म्हणेल तेव्हा बोहल्यावर चढते. मुलगी बापाला जाणते, जपते. इतरांनी सुद्धा आपल्याला जाणून घ्यावं, हीच बापाची किमान अपेक्षा असते.
Rashmi Surve
February 2, 2012 at 11:43 AM
thats true…