RSS

दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही

शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई

दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही

ओस आडोशात केले, पापण्यांचे रिक्त प्याले

मीच या वेडावणाऱ्या माझिया छायेस भ्याले

भोवती होते घृणेचे ते थवे घोंगावणारे

संपले होते निवारे बंद होती सर्व दारे

वाडगे घेवून हाती, जिद्द प्राणांची निघाली

घाबरी करूणा जगाची, लांबोनी चतकोर झाली

माझिया रक्तासवे अन चालली माझी लढाई… दु:ख उधळायास

त्या तिथे वळणावरती पण वेळ क्षण एक आला

एकटे एकत्र आले आणि हा जत्था निघाला

घोर रात्री श्वापदांच्या, माजलेले रान होते

पांगल्याना पत्थरांचे ते खडे आव्हान होते

टाकलेली माणसे अन त्यक्त ती लाचारी माती

त्यातुनी आले हृतुंचे भाग्य या घायाळ हाती

पेटती प्रत्येक पेशी मी असा अंगार झाले

आसवे अन घाम यांचा आगळा शृंगार चाले

वेदनेच्या गर्द राणी गर्जली आनंद द्वाही… दु:ख उधळायास

कोंडलेल्या वादळांच्या ह्या पहा अनिवार लाटा

माणसांसाठी उद्याच्या, येथुनी निघतील वाटा

पांगळ्यांच्या सोबतीला, येऊ द्या बलदंड बाहू

निर्मितीची मुक्तगंगा, द्या इथे मातीत वाहू

नांगरू स्वप्ने उद्याची, येथली फुलतील शेते

घाम गाळीत ज्ञान येथे, येथुनी उठतील नेते

ह्याचसाठी वाहिली हि सर्व निधाळाची कमाई… दु:ख उधळायास

- बाबा आमटे

(संकलन- ज्वाला आणि फुले)

 
 

बाबा आमटे – ज्वाला आणि फुले

माझ्या युवकांनो !
या युगयात्रेत माझ्याबरोबर येण्याची मी तुमच्यावर सक्ती करीत आहे
युद्धातल्या भरतीसाठी नव्हे
तर या विराट अभावाच्या पूर्तीसाठी
आणि तुमच्या-माझ्या अस्तित्वांना अर्थ आणण्यासाठी
मी तेथे येण्याची तुमच्यावर सक्ती करत आहे
जेथे तुमच्या गरजा तुमच्याठायी जन्मण्यापूर्वीच जाणल्या जातीलजेथे तुमच्या अंतरंगात तुम्ही ताठ उभे राहाल
आणि स्वतःच्या आत ताठ उभे राहाल
अभेद्य सेना जेथे तयार होईल
आपल्या आत तुम्ही किती मोठे आहात
हे जेथे मी तुम्हाला दाखवू शकेन
तेथे तुमचे हात जुळतील
तुमची हृदये एक होतील
तुमच्या मस्तकांचे तेथे मिलन होईल
आणि स्वप्नधुंद ज्वालांचे हितगुज तेथे चालेल
अतिथी म्हणून आलेला प्रत्येक आनंदी किरण तेथील रहिवासी होईल
तेथे ‘आज’ च्या भोवती विश्वासाचे  कुंपण असेल
आणि त्यामध्ये प्रिय कर्माची हिरवळ अमाप माजलेली असेल

- बाबा आमटे

 
 
 
Follow

Get every new post delivered to your Inbox.